राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची (India Gate) ५० वर्षांपासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली जात आहे. आता ही ज्योत इंडिया गेट ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) येथे विलीन होऊन ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही ज्योत आज दुपारी ३.३० वाजता युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन होणार आहे.
अमर जवान ज्योतीची मशाल आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात आणली जाईल. तेथे एका समारंभात दोन्ही ज्योत विलीन होतील. एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या ३,८४३ भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम १९७२ मध्ये ज्योत प्रकाशित झाली होती. यानंतर २६ फेब्रुवारी १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्योतीचे उद्घाटन केले होते. केंद्र सरकारने २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले होते. १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या २६,४६६ भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
अमर जवान ज्योती सदैव तेवत असते. फलकाभोवती चार कलश ठेवल्या जातात . मात्र वर्षभर फक्त एका कलशाची ज्योत जळत असते. दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त चार कलशांची ज्योत प्रज्वलित केली जाते. २००६पर्यंत, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसच्या माध्यमातून ती जळत होती. त्यानंतर ही ज्योती तेवत ठेवण्यासाठी पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) वापरला जाऊ लागला. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड त्याचा पुरवठा करते. एलपीजी वरून पीएनजीवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला कारण ते सुरक्षित आणि स्वस्त देखील आहे.