वर्धा : वृत्तसंस्था I जिल्ह्यातील आर्वी गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज पुन्हा कदम रुग्णालय परिसरात एक कवटी आढळली आहे. त्यामुळे आर्वी येथील गर्भपात प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. आतापर्यंत एकूण 12 कवट्या आणि 54 हाडे आढळल्या आहेत. नागपूर आणि वर्धाच्या फॉरेन्सिक टीमने तपासणी केली होती.
काय आहे हे प्रकरण?
वर्ध्यामधील आर्वी येथे एका 13 वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्याचे उघड झाले आहे. कदम हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. 30 हजार रुपयांत कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. पोलिसांच्या तपासात हॉस्पीटलच्या गोबर गॅसच्या टाकीत 11 कवट्या आणि अर्भकाच्या हाडांचे 54 तुकडे सापडले होते. त्यानंतर तक्रार झाली.
