एरंडोल ः प्रतिनिधी
तालुक्यातील गालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आला आहे. किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. काल सायंकाळी ते घरी परत आले नाही. पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
किशोर पाटील हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते.ते तळई येथील सेवानिवृत्त सचिव पुरुषोत्तम गायकवाड यांचे जावई आहेत.आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी कुंझरकर यांना गौरविण्यात आले होते. त्यांची नुकतीच राज्य शिक्षक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली होती. शालेय कामकाज करताना दलित, आदिवासी वस्तीतल्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ते नेहमी विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर होते. अनेक पुरस्कारांनी व सामाजिक संघटनांनी त्यांना गौरवण्यात आले होते.त्यांच्या सौभाग्यवती या देखील शिक्षिका आहेत. किशोर पाटील यांचा मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आला असून त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यासंदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असली तरी कुंझरकर यांच्या मृत्युचे रहस्य अजून गुलदस्त्यात असून तपासाअंती ते स्पष्ट होईल.