जळगाव ः प्रतिनिधी
ब्रिज कम्युनिकेशन ही दृकश्राव्य माध्यमात कार्य करणारी उत्तर महाराष्ट्रातील आघाडीची निर्मिती संस्था असून गेल्या २५ वर्षात ६०० पेक्षा जास्त माहितीपट, ४ चित्रपट व ५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती या संस्थेने केली आहे. भविष्यात आपल्या भागात चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजची निर्मिती करणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक, निर्माता-दिग्दर्शक मिलींद पाटील यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या नविन अत्याधुनिक सिनेमा कॅमेर्याचीसुध्दा माहिती दिली.
संस्थेचे हे रौप्य महोत्सव असून अत्याधुनिक सिनेमा कॅमेरा व लेन्सेसच्या माध्यमातून दर्जेदार निर्मिती करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत निर्मितीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या सारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र आता उत्तर महाराष्ट्रात जळगावसारख्या शहरात दर्जेदार चित्रपटांसोबतच टीव्ही मालीका आणि वेब सिरीजची निर्मितीसुध्दा सहज शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रमहर्षी स्व.ब्रिजलालभाऊ पाटील यांच्या प्रेरणेने ब्रिज कम्युनिकेशनची मुहूर्तमेढ १९९५ साली करण्यात आली. काळानुरूप व स्पर्धेच्या युगात या क्षेत्रातील बदल स्विकारत वाटचाल सुरु असून लवकरच साम टीव्ही मराठी या वाहिनीवर ‘दिपस्तंभ’ ही मालीका सुरु होणार असून त्यात राज्यासाठी दिशादर्शक ठरणार्या व्यक्ती व संस्थांचे प्रेरणादायी जीवनपट प्रदर्शीत केले जाणार आहे. यापूर्वी ‘खान्देशरत्न’ ही ३२ भागांची मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात आली आहे. भविष्यात या संस्थेमार्फत मराठी चित्रपट, वेब सिरीज, म्युझिक अल्बम, कार्पोरेट फिल्म्स डॉक्यूमेंटरी असे विविध प्रकल्प सुरु करीत असून यामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मिलींद पाटील यांनी स्पष्ट केले.