जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे ज्येष्ठ खेळाडूंच्या आठव्या मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद अमळनेर संघाने मिळविले. तर जळगावचा वायसीसी संघ उपविजेता राहिला.
जिल्ह्यातील दिवंगत क्रिकेटपटूंच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा सन १९८०-९० च्या दशकात एकमेकांसोबत तसेच विरुद्ध खेळलेले माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळले. सहा संघांनी यात सहभाग घेतला. पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या जळगाव शहर व तालुका संघाला अमळनेरने तर वायसीसीने आरसीसीचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अंतिम सामन्यात अमळनेर संघाने वायसीसी संघाने २३ धावांनी पराभव करून प्रथमच मास्टर्स चषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
कैलास पांडे, शक्ती महाजन, तेजस दोडे, प्रवीण पटेल, चेतन पाटील, नीलेश महाजन, स्वप्निल सूर्यवंशी, संभाजी पाटील हे सामनावीर ठरले. स्पर्धेच्या प्रसंगी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा सरकारी वकिल केतन ढाके, अभिजित पाटील, मुकेश हासवाणी, मनोज चौधरी, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, किरण दहाड, हरिभाऊ उपाध्ये, रूपेश अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेला जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजू खेडकर, उपाध्यक्ष शरीफ़ पिंजारी, कोषाध्यक्ष बाबा शिर्के, नामदेव हटकर, सुमित अहिरराव, किरण चौधरी, नितीन पाटील, राहुल चौधरी, वैभव बडगुजर, चेतन वाघ, निखिल वाणी आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज वाघ, नरेश देशपांडे यांनी केले. तर समालोचन गणेश पाटील यांनी केले.