‘आंदोलनजीवी’ शब्दावरून पंतप्रधान मोदींवर चोहोबाजूंनी पलटवार!

0
15

 संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

नवी दिल्ली : संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवा शब्द समोर आणला होता… हा शब्द होता ‘आंदोलनजीवी’… प्रत्येक आंदोलनात दिसणाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हा शब्द वापरला होता. परंतु, पंतप्रधानांच्या याच शब्दावर विरोधी पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या आंदोलनांशी निगडीत व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आंदोलनजीवी’ शब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान केल्याची भावना ‘संयुक्त किसान मोर्चा’ या शेतकरी संघटनेनं व्यक्त केलीय. गेल्या ७५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्याला विरोध करत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळेच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. ‘आंदोलनजीवी’ असल्याचा आम्हाला गर्व आहे, असं शेतकरी संघटनांनी म्हटलंय.

पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही स्वत:ला ‘आंदोलनजीवी’ म्हणवून घेतलंय. ‘मला आंदोलनजीवी असल्याचा गर्व आहे. जसे महात्मा गांधीही आंदोलनजीवी होते’

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करून ‘मोदींच्या आंदोलनाजीवी टिप्पणीची दुटप्पी भूमिका तसंच आपलं आरामदायक आयुष्य सोडून शेतकरी शेतकरी, अल्पसंख्यांक, गरीब आणि कमकुवत लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न यासोबतच विरोधकांच्या कमकुवतपणावर जिवंत राहणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? परजीवी?’ असा सवाल विचारला आहे.

‘होय, मी आंदोलनजीवी’

स्वराज इंडियाचे अध्यक्ष आणि शेतकरी आंदोलनाशी निगडीत कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही ‘होय, मी आंदोलनजीवी आहे’ असं म्हणत पंतप्रधान मोदींवर पलटवार केलाय. ‘वसाहतवादी शासनकर्त्यांपासून भारताला मुक्त करणारेही आंदोलनजीवी होते, याची आठवण पंतप्रधानांना करून देऊ इच्छितो. म्हणूनच आम्हाला आंदोलनजीवी असल्याचा अभिमान आहे. ते भाजप आणि त्यांचे पूर्वजच होते ज्यांनी कधीही इंग्रजांच्या विरोधात कोणतीही चळवळ उभी केलेली नव्हती’ अशी टिप्पणीही योगेंद्र यादव यांनी केलीय.

याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत, माकपा महासचिव सीताराम येचुरी यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

‘आंदोलनजीवी जमात’

‘आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी… बुद्धीजीवी… असे शब्द आपल्याला माहीत आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून एका नव्या जमातीची पैदास देशात झाल्याचं मला दिसून येतंय आणि ही आहे ‘आंदोलनजीवी’ जमात… वकिलांचं आंदोलन सुरू आहे, तिथे ही जमात जाणार… विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दिसणार… मजुरांचं आंदोलन सुरू आहे तिथेही दाखल होणार… कधी पडद्याच्या मागे तर कधी पडद्याच्या समोर… ही संपूर्ण टोळीच आंदोलनजीवी आहे. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आपल्याला अशा लोकांना ओळखायला हवं…’ अशी टोलेबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here