बोदवड, प्रतिनिधी । तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी 28 एप्रिल 2020 रोजी केली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी , तहसिलदार हेमंत पाटिल व तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी पाचपट दंडात्मक कार्यवाही न करता स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या. तद्नंतर मौजे जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारकाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवलेला असून सदरील तक्रारीची चौकशी कामी जिल्हाधिकारी जळगाव यांनी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठित केली होती.
सदर समितीने महालक्ष्मी स्टोन क्रेशर धारक यांनी 4294.21 ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला असल्याने गौण खनिजाकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोदवड तहसीलदारांना आदेश दिले आहे. 4 कोटी 86 लाख 29 हजार 771 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तिन तहसिलदारांच्या बदल्यानंतर महसूल प्रशासनाकडून मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये बोदवड तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी दिनांक 20/01/2022 रोजी आदेश काढले आहेत.
अवैध ऊत्खनन केल्याप्रकरणाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर तत्कालीन तहसिलदार रविंद्र जोगी , तहसिलदार हेमंत पाटिल यांनी दंडात्मक कार्यवाही न करता वेळोवेळी स्वामित्वधनाच्या रकमा भरुन घेतल्या होत्या. तद्नंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ऊपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्त समिती गठीत करण्यात आली होती. यानंतर तत्कालीन तहसिलदार प्रथमेश घोलप यांची बदली झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार नुतन तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी 4 कोटी 86 लाख 29 हजार 771 रुपयांचा दंड ठोठावल्याचा आदेश काढला आहे. तब्बल तिन तहसीलदारांच्या बदल्यानंतर तसेच दिड वर्षाच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर तक्रारी निकाली निघाल्या आहेत.