जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना’ म्हटले की अजूनही संमिश्र भावना जागी होते कारण कोणाला हे संकट तर कोणाला ती संधी वाटते. गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रातही ऑनलाईनचीच चर्चा होती.जळगावच्या देवेश भय्या या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने पालकांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत १२ सुवर्णपदके प्राप्त करीत जणू विक्रमच केला आहे.
अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने ८०० पैकी ८०० गुण मिळवित ग्रँड ऑनर ऍवार्ड मेडल’ प्राप्त करीत १२ व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथमध्ये स्थान मिळविले आहे.थायलंड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड या तीनही परिक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवित सुवर्णपदके मिळविली.सिंगापूर ऍन्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलींपियाड, हॉंग कॉंग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारु कॉम्पीटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलींपियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षेत देवेशला ‘इंटरनॅशनल गोल्ड मेडल’ प्राप्त झाली आहे. या परिक्षांपैकी तीन परिक्षेत देवेशला ‘वर्ल्ड चॅम्पीयन’ होण्याचा सन्मान देखील लाभला.
वर्ल्ड इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाडमध्ये द्वितीय रँक तर आशिया इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाडमध्ये तृतीय रँक (वर्ल्ड सेकंड रनर अप) हे स्थान प्राप्त करीत त्याने आणखी दोन सुवर्णपदके पटकावली.या बारा सुवर्ण पदकाशिवाय याच कालावधीत देवेशला अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.८ वी) मध्ये प्रथम रँक तर अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.१० वी) मध्ये ऑनर’चा बहुमान मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन मॅथ कॉन्टेस्टमध्ये त्याने हायर डिस्टींग्शन’ तर पर्पल कामेंट मॅथ मीट २०२० चा तो विजेता ठरला आहे.
‘ऍलन चॅम्प २०२० बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया’ म्हणून देखील देवेशची निवड झाली आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सेट प्रीकॉलेज न्यूज लेटरमध्ये त्याचा छायाचित्रासह परिचय प्रकाशित करण्यात आला आहे.
देवेश हा एल.एच.पाटील इंग्लीश मिडीयम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी असून सानेगुरुजी कॉलनी परिसरातील व्यंकटेश कॉलनीमधील रहिवासी आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरियर डिझाईनर सौ.पल्लवी भय्या यांचा तो सुपूत्र आहे.गेल्या वर्षी देवेशला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने राष्ट्रपती व पंतप्रधानाच्या उपस्थितीत दिल्लीत गौरविण्यात आले होते.
कोरोनामुळे यावर्षी यापैकी अनेक परिक्षांचा प्रत्यक्ष परितोषिक वितरण सोहळा रद्द करण्यात आला असून सर्व परिक्षांचा निकाल, गुणपत्रके, प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीनेच आम्हाला प्राप्त झाले आहेत. सुवर्ण पदके टपालामार्फत पाठविली जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले असल्याची माहिती देवेशचे वडिल आर्किटेक्ट पंकज भय्या यांनी दिली.