मुंबई, प्रतिनिधी । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिरजे जखमी झाला आहे. हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगीही गाडीत होती. अपघातात त्यांनाही दुखापत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
1985 मध्ये आलेल्या ‘टार्जन` चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. तळेगाव टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे”.
हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून मुलगी सुरक्षित आहे. मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
‘टार्जन` चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेले हेमंत बिरजे सध्या मात्र बॉलिवूडपासून दूर आहेत.हेमंत बिरजे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिरजे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिरजे यांना पहिला चित्रपट मिळाला. अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.