जळगाव ः प्रतिनिधी
अमृत योजनेंतर्गत अपार्टमेंटला एकच नळ कनेक्शन देण्याचे धोरण ठरत असताना त्याला आता विरोध सुरू झाला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवक सचिन पाटील यांनी आयुक्तांना निवेदन देऊन प्रत्येक फ्लॅट धारकाला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याची मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी महापालिकेत सत्ताधारी भाजप, विरोधी पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले आहे. यात एका अपार्टमेंटला एक नळकनेक्शन देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, सत्ताधारी भाजपतूनच याला विरोध सुरू झाला आहे.
नगरसेवक सचिन पाटील यांच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार त्यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. त्यात ३० ते ४० वर्षांपूर्वी नगरपालिका असताना नगररचना
विभागाकडून मंजुरी प्राप्त करून बांधकाम केले आहे. त्यावेळच्या नगररचना विभागाच्या अटी-शर्तींचे पालन केले आहे. आता अमृत अंतर्गत पाणीपुरवठा करण्याबाबत सदनिकाधारकांना साठवण टाकी बंधनकारक केली आहे. परंतु, ते अडचणीचे असल्याचे सचिन पाटील यांनी नमूद केले आहे.