जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत शासनाचा निधी वेळेत खर्च न झाल्याने परत पाठवण्याची नामुष्की आली आहे. आता देखील ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे शिल्लक काळात कामे पूर्ण करून निधी परत जाणार नाही याची काळजी घ्या. परंतु केवळ अधिकार्यांच्या निष्क्रियतेमुळे निधी परत गेल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा महापौर जयश्री महाजन यांनी दिला आहे.
विलंबाची कारणे जाणून घेतली
महापालिकेत महापौर व उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बुधवारी प्रथमच जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. विभागांमार्फत कोणती महत्त्वाची कामे सुरू आहेत याचा आढावा घेतला. तसेच कामांच्या प्रगती व विलंबाची कारणे जाणून घेतली.
या वेळी बांधकाम विभागासह प्रभाग अधिकारी व अभियंते यांची उपस्थिती होती. अमृत अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मिलनिस्सारण योजनेची माहिती घेतली. साफसफाईचा ठेका असलेल्या वॉटर ग्रेसच्या कामाची माहिती जाणून घेतली.
झाले ते विसरा अन् कामावर लक्ष द्या
गेल्या अडीच वर्षात काय झाले आणि कशामुळे झाले याचा विचार व चर्चा न करता आहेत ती कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने लक्ष केंद्रित करावे. कामे पूर्ण करताना कोणत्याही अडचणी असतील तर बिनधास्तपणे माहिती द्या. त्यामुळे कामातील अडचणी दूर होऊन कामांचा मार्ग मोकळा होईल असे महापौरांनी सांगितले. या सर्वांचा परिणाम शहरातील जनतेवर होत असतो. नागरिकांना कोणत्याही तक्रारींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवावे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दिला.