मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
१ जानेवारी रोजी मुक्ताईनगर शहरातील काढण्यात आलेल्या अतिक्रमनातील जप्त केलेले भंगार चक्क तहसीलदार यांच्या निवासस्थानासमोरील धान्य गोडाऊनच्या आवारातून लंपास झाले असून ‘महसूल प्रशासनाने मारला अतिक्रमणाच्या भंगारवर डल्ला’ अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतद्वारा दि.१ जानेवारी रोजी मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली ते प्रवर्तन चौक तसेच जुने गाव वरणगाव रस्ता व खामखेडा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. महसूल नगरपंचायत व पोलीस विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या धडक मोहिमेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण धारकांचे लोखंड, लोखंडी पत्रे, त्यात असलेली साहित्य यासारखे भंगार जप्त करण्यात आलेले होते.
हा भंगार डंपरमधून तहसीलदार यांच्या निवासस्थान असलेल्या धान्य गोडाऊनच्या परिसरात आणून टाकण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचे भंगार त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले. या ठिकाणी जवळपास लाखो रुपयांचे भंगार जप्त करण्यात आलेले होते. तब्बल चार ते पाच डंपर भरून एवढे भंगार तहसीलदारांच्या निवासस्थान असलेल्या धान्य गोडाऊनच्या परिसरात आणून टाकण्यात आलेले होते. परंतु येथील भंगार लंपास झाल्याने परंतु येथील मंगलम बंद झाल्याने अतिक्रमण धारकांनी भंगार चोरी गेल्याचा आरोप केलेला आहे.
या संदर्भात तहसीलदार श्वेता संचेती यांना विचारले असता भंगार आम्ही जप्त केलेले नव्हते तर उचलून आणून आवारात टाकलेले होते. भंगार सांभाळण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाची नाही. तसेच आमचे कर्मचारी भंगार सांभाळतील का? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी याप्रसंगी केला.