अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन; भाजपा बॅकफूटवर

0
17

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव दौरा राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी महत्त्वाचा मानला जाणार आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय मिळाले किंवा मिळणार हे अद्याप सांगता येणार नाही. तरी पक्षीय पातळीवर आणि राजकीयदृष्ट्या हा दौरा यशस्वी ठरल्याचे चित्र आहे.

 

वास्तविक, जळगाव जिल्ह्यातील २००९ च्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात पाच आमदारांसह राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा अच्छे दिन आले आहेत. जिल्ह्यात भाजपा सध्या बॅकफूटवर आहे. भाजपाला मागे ठेवण्यात खडसेंचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनाही सहकार क्षेत्रात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीची जोरदार फलंदाजी सुरू आहे.

अमृत योजनेने भाजपाच्या मुळावर घाला घातल्याची स्थिती आहे. जळगाव शहरातील एकाही रस्त्यावर धड चालणे शक्य नाही. हे पाप कुणाचं? हा प्रश्न सध्या जनतेला सतावत आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील प्रश्नांवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अधिक आक्रमक दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. गेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात गिरीश महाजन यांनी मला शंभर दिवस द्या, असे म्हणाले होते. आता नऊशेहून अधिक दिवस उलटून गेले तरी जळगाववासीयांच्या नशिबी फळ आलेले नाही. या सगळ्याचा फटका भाजपला भविष्यात महागात पडण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या संदर्भात, दिग्गज नेते असूनही या नेत्यांमध्ये एकसंघपणा नव्हता. नाथाभाऊंनी पक्षात प्रवेश केल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. परंतु, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे नेते एकत्र आले आहेत, ही बाब विरोधकांसाठी चिंतेची बाब आहे. अजित पवार यांनी खडसे यांचे २४ कॅरेट सोनं म्हणून केलेला उल्लेख खडसेंसाठी आणि त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी, लेवा पाटीदार समाजासाठी सकारात्मक मानावा लागेल. खडसेंना चांगले पद देण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचेही या वक्तव्यावरून दिसून येते.

भुसावळमधील २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी खडसे यांच्याशी जुळवून घेण्याचे दिलेले संकेत हेही या दौऱ्याचे राजकीय फलित मानले पाहिजे. सध्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीमध्ये उत्साह आहे. याचा फायदा पक्षाला या निवडणुकीत निश्चितच होणार आहे. त्याचा उपयोग महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठीही होऊ शकतो. या संभाव्य यशासाठी आपल्या डोक्यात हवा जाऊ नये, ही एक पूर्वशर्त असेल.

अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा देऊनही एसटी संपाची कोंडी फोडण्यात सरकारला अपयश आले आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी जलदगतीने प्रयत्न व्हायला हवेत. अजितदादांचा दौरा राष्ट्रवादीसाठी बूस्टर डोस असला, तरी सर्वसामान्यांना त्यातून फारसा फायदा झाला नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here