…अखेर सत्तासंघर्षात १७ मजलीवर भगवाच फडकला

0
15

जळगाव : प्रतिनिधी
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसनं परफेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकत महापौरपदी जयश्री सुनिल महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांनी विजय मिळविला आहे. शिवसेनेने ही लढत ४५ विरुध्द ३० अशा फरकाने जिंकत महापालिकेवर भगवा फडकविला आहे. त्यामुळं सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून निसटली आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींमुळं बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी विशेषत: शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
महापालिकेत भक्कम बहुमत असलेल्या भाजपला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची खात्री होती. मात्र राजकारणाच्या सारीपटावर निश्‍चितता कधीच नसते, हे पुन्हा जळगाव महापालिकेच्या निवडणूकीतून आज सिध्द झाले आहे. पाच दिवसाच्या राजकीय नाट्यात भाजपमध्ये उभी फूट पडली. शिवसेनेने भाजपच्या कुलभूषण पाटील व इतरांच्या मदतीने भाजपात उभी फूट पाडत भाजपला हादरा दिला. या फूटीच्या डॅमेज कंट्रोलसाठी भाजपचे सर्वच प्रयत्न फोल ठरले.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी आज सकाळी ११ वाजता महापौर व उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेला पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर आयुक्त सतिश कुलकर्णी हे होते. मतदान सुरु होण्याआधीच सभागृहात गदरोळ झाला. भाजपने पहिल्यांदा शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेत उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली. याबाबत पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांनी भाजपची मागणी फेटाळून लावली. त्यावेळी सभागृहात गोंधळ उडाला होता. निवड प्रक्रिया सुरु असतांनाच स्थायीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी ही सभा बेकायदेशीर असल्याचे म्हणत न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. यानंतर मात्र निवड प्रक्रिया सुरु झाली. ऑनलाईन मतदान सुरु झाल्यानंतर आवाज बरोबर येत नसल्याची तक्रार महापौर भारतीताई सोनवणे व ऍड. सुचिता हाडा यांनी केली असता यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी निवडणूक प्रक्रियेत वारंवार अडथळा आणणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. यामुळे सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला. त्यानंतर सर्व नगरसेवकांचे मतदान घेण्यात आले.
या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री सुनिल महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना ३५ मते मिळाली. शिवसेनेचे १५ तर भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मतदान टाकल्याने हा आकडा ४५च्या घरात जात शिवसेनेचा विजय सुकर झाला.
भाजपा जाणार न्यायालयात
महापौर व उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर भाजपच्या ऍड. सुचिता हाडा यांनी आक्षेप नोंदविला असता पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदर आक्षेप रद्दबातल ठरविला. यावरुन भाजपने न्यायालयात जाण्याची घोषणा केली. उमेवारी दाखल करतांना जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांच्या अर्जात अनेक त्रुटी असल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. यावेळी सभागृहात वाद निर्माण झाला होता. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी होणारी ऑनलाईन सभा ही बेकायदेशीर असून याबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत. ते म्हणाले की, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम २००५च्या प्रमाणे होत नसून या निवड प्रक्रियेविरोधात आम्ही कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात जाणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here