मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या डॅशिंग, फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil)यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्या लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) घड्याळ हाती बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी पार पडेल .
गेल्या काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली होती. हे पाहता रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा पाठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
रुपाली पाटील या मनसेतील धडाडीच्या नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांचा इतर पक्षातील नेत्यांशी उत्तम संपर्क होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या त्या अतिशय जवळच्या आहेत. रुपाली यांनी मनसेतील नाराजी जाहीरपणे बोलून दाखविल्यानंतर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा सुरु झाली होती. आता ती चर्चा प्रत्यक्षात खरी ठरली आहे.