जळगाव ः प्रतिनिधी
येथील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. संबंधीत प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळूंदे हे वास्तव्यास नाशिकला असतात, त्याचा गैरफायदा घेत स्थानिक उपविभागीय अभियंता हे त्यांचा मनमानी कारभार चालवित असल्याच्या तक्रारी जोर धरीत आहेत. याबाबत काही ठेकेदार अधिक्षक अभियंता व मुख्यअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जळगाव येथील मुख्यमंत्री सडक योजनेच्या कार्यालयातील अजब गजब किस्से यापूर्वीही सायंदैनिक साईमतने सडेतोड प्रकाशित केले आहेत. यात नव्याने भर पाडीत स्थानिक उपविभागीय अभियंते यांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदार त्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे यांचा रहिवास नाशिकला असल्याने ते आठवड्यातून 1 ते 2 दिवस फक्त येथील कार्यालयात वेळ देवू शकतात. याचाच गैरफायदा उपविभागीय अभियंते घेत असून त्यांच्या मनमानी पध्दतीने भोंगळ कारभार चालवित असल्याच्या तक्रारी आता समोर येवू लागल्या आहेत. याबाबत काही सुज्ञ ठेकेदार व नागरिक अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार देण्यासाठी जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी अंकुश ठेवावा
येथील कार्यकारी अभियंता विजय पाटील यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांचा पदभार प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून विवेक माळुंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. श्री.माळुंदे यांनी आपल्या जळगाव येथील कार्यालयातील भोंगळ कारभार करणाऱ्या उपविभागीय अभियंत्यांवर अंकुश ठेवावा व ठेकेदारांना वेठीस धरणाऱ्या अभियंत्यांवरही कारवाईचा बडगा उगारावा अशी अपेक्षा ठेकेदारांकडून व्यक्त केली जात आहे.



