मुंबई : “तोक्ते चक्रीवादळाची (Touktae Cyclone) सूचना मिळाल्यानंतरही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि दोषी असेल त्यांना शिक्षा द्या” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली.
“तोक्ते चक्रीवादळाच्या धोक्याबाबत सरकार व संबंधित यंत्रणांनी अलर्ट दिलेला असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष केला. ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. एक बार्ज बुडून ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही काही कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगार मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने व तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या सर्व घटनेला ओएनजीसी जबाबदार आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
तौते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला – @nawabmalikncp pic.twitter.com/Qulk6tv7ku
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 20, 2021
दरम्यान, बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर रात्री धर्मेद्र प्रधान चौकशी समिती नेमत आहेत. या चौकशी समितीने काही होणार नाही. जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणीही मलिक यांनी केली.
