सोयगाव : प्रतिनिधी
बसथांब्यावर बसच्या प्रतीक्षेत असलेले सात प्रवाशी बसमध्ये बसताच अचानक बस स्थानक कोसळल्याची घटना निंबायती फाट्यावर शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दैव बलवत्तर होते म्हणून बसमध्ये चढलेले प्रवाशी बचावले आहे.
सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावरील निंबायती फाट्यावर बस थांबा आहे. हा बसथांबा अनेक दिवसांपासून खिळखिळा झालेला होता. केवळ छत असलेल्या बस थांब्याची मदार खांब्यावर होती. परंतु नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे हा बस थांबा धोकादायक झाला होता. शनिवारी दुपारी बस थांब्यात सात प्रवाशी बसची प्रतीक्षा करत उभे होते. दुपारी दोन वाजता सोयगावकडून बनोटीकडे जाणारी बस थांब्यावर उभी राहिली. बस थोडी पुढे निघाल्यावर छतासह पूर्ण बस थांबा पत्त्यासारखा कोसळला. दरम्यान बस थांबा कोसळल्याचा आवाज येताच परिसरातील, शेतातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही. दरम्यान, बस थांबा कोसळल्याची घटना घडूनही प्रशासनाच्यावतीने अद्यापही एकही यंत्रणेने भेट दिलेली नाही, हे विशेष. सार्वजनिक विभागाच्या अखत्यारीत हा बस थांबा आहे. परंतु अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने घटनास्थळी कोणीही भेट दिलेली नव्हती.