सिंधुदुर्ग : वृत्तसंस्था
कणकवली तालुक्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील १५ वर्षीय अंशिता अशोक ताम्हणकर हिने माटुंगा जिमखाना फोर स्टार टूर्नामेंट (वूमन) टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यामुळे साळिस्ते गावाबरोबर जिल्ह्याचीही मान उंचावली आहे. त्यामुळे तिच्या गावासह जिल्ह्यात ताम्हणकर हिचे कौतुक केले जात आहे.अंशिता ही या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक होती. अनेक मातब्बर स्पर्धकांना तिने कडवी झुंज दिली. याबद्दल तिचे साळिस्ते गावातून अभिनंदन केले जात आहे.
अंशिता हिची यापूर्वी १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती.त्यावेळी तिने पुणे येथे झालेल्या ८४ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
सिंधुदुर्गातल्या मूळ गाव साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील सहदेव गोपाळ ताम्हणकर यांची नात असलेली अंशिता मुंबई शहराची एक नंबरची खेळाडू असून तिने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षांपासून अंशिता टेबल टेनिस खेळत असून ती स्पिनॅर्ट अकॅडमीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश मुरेकर आणि चार्वी कावले यांच्याकडे या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे तर आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये तिने चमक दाखवली आहे.
यापूर्वी ८१ व्या राज्यस्तरीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने मुंबई संघाचे १२ वर्षाखालील मुलींच्या संघाचे कर्णधार म्हणीींक्षक्ष प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर गतवर्षी पुन्हा १९ वर्षाखालील मुलींच्या मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अंशिताची निवड झालेली होती.
अलीकडेच अंशिता १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी साऊथ कोरियाला जाऊन आली आहे. तिथे तिला किंग यु यांनी प्रशिक्षण दिले तर अलीकडेच माटुंगा इंडीयन जिमखाना थ्री स्टार टेबल टेनिस स्पर्धेत १७ व १९ वर्षाखालील मुलींमध्ये रौप्य पदक प्राप्त केले.