साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह बहुतांश तालुक्यात मागील ३० दिवसापासून पावसाचा खंड पडलेला आहे. खरिप हंगामातील पिकांची वाढ खुटलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अधिसूचना निर्गमित केल्यास पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात मिळू शकणार आहे. अशा सूचना नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ना.गिरिष महाजन यांनी दिल्या होत्या. चाळीसगाव मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र दिले आहे. लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रत्यक्ष पाहणीवेळी व शेतकऱ्यांसोबत चर्चा करत असताना असे लक्षात आले की, चाळीसगाव तालुक्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदी पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागात पिकांना पाणी उपलब्ध न झाल्याने पिक सुकत आहेत. याबाबत बहुतांश शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा लाभ घेतलेला आहे. आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे.
नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात मिळू शकेल
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या २६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्भवल्याने म्हणजेच एका महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (२.५ mm पेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देय आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अधिसूचना निर्गमित केल्यास पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात मिळू शकेल.
चाळीसगाव तालुका पीकविमा नोंदणीत जिल्ह्यात अग्रेसर
चाळीसगाव तालुक्यातील ९ पैकी ५ मंडळांमध्ये गेल्या २१ दिवसात पावसाची नोंद झालेली नाही. ते २५ टक्के नुकसान भरपाईच्या निकषात पात्र ठरत आहेत. इतर ४ मंडळांमध्येही सारखीच परिस्थिती असल्याने ते मंडळ निकषात बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले. तसेच पीकविमा नोंदणीमध्ये चाळीसगाव तालुका जिल्ह्यात अग्रेसर असल्याने नुकसान भरपाईचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.