आरोपींना अटक अन् मदतीच्या नावाखाली हप्ता; एसीबीच्या ‘पडताळणी’त पीएसआय चंद्रकांत कामठे जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर
रक्षकच भक्षक बनल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात उघडकीस आला आहे. एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेतील (EOW) पोलीस उपनिरीक्षक (PSI) चंद्रकांत कामठे (वय ३८, रा. सातारा परिसर) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अखेर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय तक्रारदाराच्या अर्जावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल केल्याचे ‘बक्षीस’ म्हणून आणि प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करून मदत करण्यासाठी पीएसआय चंद्रकांत कामठे याने स्वतःसाठी आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक पवार यांच्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली होती. तक्रारदार वृद्धाची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी घाबरून न जाता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), छत्रपती संभाजीनगर गाठून तक्रार नोंदवली.
संशय आल्याने टाळाटाळ, पण ‘एसीबी’चा दणका!
तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, पीएसआय कामठे याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडीअंती ती स्वीकारण्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, कारवाईचा सुगावा लागताच कामठे याने तक्रारदाराला भेटणे टाळले व मधल्या काळात पो.नि. पवार यांची बदलीही झाली. आरोपीने पैसे स्वीकारणे टाळले असले, तरी ‘पंचांसमक्ष लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे’ एसीबीने पीएसआय कामठे याच्यावर थेट गुन्हा दाखल करत खाकीचा बुरखा फाडला आहे.
ही धडक कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, तपास अधिकारी चैनसिंग गुसिंगे आणि हवालदार रवींद्र काळे यांच्या पथकाने केली.
