विद्यार्थ्यांच्या प्रतिभा, व्यक्तिमत्त्व विकासाचे मनमोहक सादरीकरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील प्रेमनगरातील बी. यू. एन. रायसोनी शाळेचा १२वा वार्षिक “एक्सझुबेरेंट” कार्यक्रम महाबळ रस्त्यालगतच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात नुकताच पार पडला. रंगीबेरंगी सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षमतेचा ठसा उमटविण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देण्यात आला. भारतीय संस्कृतीतील मूल्यांची जाणीव करून देत आधुनिक समाजातील बदलांवर चिंतन मांडण्यात आले. विशेष ठळक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जन्मजात कौशल्यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या “मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट” उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम परिसरातील इतर शाळांमध्ये अभावाने आढळणारा शैक्षणिक प्रयोग असल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसशास्त्रीय समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिका, गीते व नृत्यांनी सायंकाळ संस्मरणीय बनवली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक निमंत्रणांचा वापर केला गेला आणि “कागद वाचवा, झाडे वाचवा, पृथ्वी वाचवा” थीम कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरली.
उत्कृष्ट विद्यार्थ्यांसह कलाकारांचा गौरव
शेवटी अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थ्यांसह कलाकारांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मनमुराद आनंद घेत बी. यू. एन. रायसोनी शाळेच्या सर्जनशीलता व संस्कारांची परंपरा गौरवपूर्णरित्या अनुभवली.
