छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटखा माफियांची दहशत आणि मुजोरी अत्यंत टोकाला पोहोचली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माफियांच्या गुंडांनी थेट कारवाई करणाऱ्या महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (९ जून) पहाटे वाळूज परिसरातील रहीमपूर येथे सापळा रचला होता. गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी एका आयशर ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात तब्बल २५ पोती प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला सापडला. हा मोठा साठा जप्त केल्यानंतर एफडीएचे पथक पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस संरक्षणाची वाट पाहत थांबले होते.
’यांना गोळ्या घाला!’… आणि स्कॉर्पिओ अंगावर घातली
पथक घटनास्थळी असतानाच, अचानक एका विनानंबरच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून ५ ते ६ हत्यारबंद गुंड तिथे आले. “यांना गोळ्या घाला!” अशा आरोळ्या ठोकत त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गुंडांनी त्यांची भरधाव स्कॉर्पिओ थेट तिथे उपस्थित अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा जीवघेणा हल्ला पाहून काही अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिराच्या मागे पळून जाऊन कसाबसा स्वतःचा जीव वाचवला.
महिला अधिकाऱ्याचा थरारक पाठलाग
या गुंडांनी विशेषतः महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले. एका आरोपीने थेट त्यांच्या दिशेने वेगाने गाडी चालवून त्यांचा पाठलाग केला. मात्र, अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी कमालीचे प्रसंगावधान दाखवत ऐनवेळी बाजूला उडी मारली, ज्यामुळे त्यांचा जीव बालंबाल वाचला. या संपूर्ण गोंधळाचा फायदा घेत माफियांच्या साथीदारांनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक उघडपणे पळवून नेला.
या धक्कादायक प्रकारानंतर वाळूज पोलीस ठाण्यात आरोपींविरोद्धात जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder), सरकारी कामात अडथळा आणणे आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पळून गेलेला गुटख्याचा ट्रक आणि इतर मुख्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
