महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलून पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी लावलेल्या एका विशिष्ट बॅनरमुळे राजकीय वर्तुळात थेट ‘बंडाचे’ संकेत मिळत असून, भुजबळ आता कोणता मोठा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘साहेब हीच वेळ योग्य निर्णय घेण्याची…’ समर्थकांचे थेट आवाहन
नाशिक शहरात छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी लावलेले फलक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फलकांवर “साहेब हीच वेळ योग्य निर्णय घेण्याची” असा थेट आणि सूचक मजकूर लिहिण्यात आला आहे. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने कमालीचे नाराज असलेल्या भुजबळांना समर्थकांनी आता आरपारची लढाई लढण्याचा आणि पक्ष सोडण्याचा किंवा वेगळा राजकीय मार्ग निवडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच या पोस्टर्सच्या माध्यमातून दिला आहे.
पडद्यामागे काय घडलं? ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावर दिल्लीतून रेड सिग्नल?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ स्वतः राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक होते. मात्र, त्यांनी महायुतीसमोर एक मोठी अट ठेवली होती. जर ते दिल्लीत राज्यसभेवर गेले, तर राज्यातील त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना देण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. परंतु, भुजबळांच्या या अटीला दिल्लीतील भाजप नेतृत्वाने ‘रेड सिग्नल’ दाखवला. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून हा निर्णय अडकल्याचे बोलले जात आहे. अखेर पक्षाने भुजबळांना धक्का देत थेट राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली.
“माझ्याच बाबतीत नियम का बदलला?” भुजबळांनी बोलून दाखवली खदखद
या संपूर्ण घडामोडींवर स्वतः छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली तीव्र नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले:
”मला राज्यसभा आणि लोकसभेला जाण्याची इच्छा होती. यापूर्वी ४ ते ५ वेळा अशी संधी हुकली, यावेळी तरी न्याय मिळेल अशी आशा होती. पक्षात इतरांना जो न्याय लावला, तोच मला लावावा हीच माझी विनंती होती. मकरंद पाटील मंत्री आहेत आणि त्यांचे भाऊ खासदार आहेत. सुनेत्रा पवार खासदार आहेत आणि कुटुंब राजकारणात आहे. तटकरे स्वतः खासदार आहेत आणि त्यांचे पुत्र आमदार आहेत. मग माझ्याच बाबतीत घराणेशाहीचा नियम का बदलला?”
“…मी बुद्धिबळाचा नाही, कबड्डीचा खेळाडू!”
आपल्या पुढील भूमिकेविषयी बोलताना भुजबळांनी महायुतीला आणि पक्षाला सूचक इशारा दिला आहे. “मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही. मला बुद्धिबळातल्या चाली खेळता येत नाहीत,” असे सांगत त्यांनी आपण राजकारणाच्या मैदानात समोरच्याला थेट आस्मान दाखवण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
भुजबळ समर्थकांचा हा आक्रमक पवित्र पाहता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आणि महायुतीला नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
