साईमत न्यूज नेटवर्क –
जयपूरच्या खोह नागोरियान परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका अल्पवयीन मुलासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये रहीम, 15 वर्षीय रुबिन आणि अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये अजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल आणि अशफाक यांचा समावेश असून त्यांना तातडीने जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार, अनेक जखमी 90 टक्क्यांहून अधिक भाजलेले आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जयपूरचे जिल्हाधिकारी संदेश नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोह नागोरियान येथील आयशा नगर तलाई परिसरात, आयटीआय कॉलेजजवळ हा फटाका कारखाना होता. प्राथमिक अंदाजानुसार, ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेवर आमदार अमीन कागझी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवासी भागात स्फोटक/फटाका गोदाम कसे सुरू होते, याची माहिती पोलिसांना नव्हती का, असा सवाल त्यांनी केला. तसेच या कारखान्याचा मालक कोण आहे, याबाबतही स्पष्टता नसल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, मृत व्यक्ती बाहेरील असल्याचा मुद्दा उपस्थित करून जबाबदारी टाळता येणार नाही. ही गंभीर प्रशासनिक चूक असून संबंधित यंत्रणांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
