जामनेर, प्रतिनिधी । शहरातील जुना बोदवड रोडवरील सहा वर्षीय बालिकेला खाऊचे आमिष दाखवीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बालिकेचा एका वृध्दाने विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याला जमावाने चोप दिल्याची घटना येथे घडली.
शहरातील जुना बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग (वय ५८) या वृद्धाने परिसरातील सहा वर्षीय बालिकेला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून तिचा विनयभंग केला. बालिकेच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच ते संशयिताच्या घराकडे आले असता त्या वृद्धाने बालिकेच्या कुटुंबियांशी अरेरावी केली. यामुळे जमावाने त्याला जोरदार चोप दिला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक किरण शिंदे हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी आले. संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. यात पोलिसांच्या वाहनाची काच फुटून चार पोलिस जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगवली. याप्रकरणी बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादिवरून हाफिस बेग याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात झाला.