जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सत्यम पार्क मधील विवाहित महिलेने कौटुंबिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील सत्यम पार्क मधील सुनिता शरद पाटील (वय-३०) व तिचे पती शरद मंगल पाटील यांच्यात गेल्या १० वर्षांपासून कौटुंबिक वाद आहेत. दोघांचा संसार सुरळीत व्हावा यासाठी अनेकांनी मनोमिलनाचा प्रयत्न केला. परंतू शरद पाटील हा विवाहितेला मारहाण करत असल्याने त्या विभक्त राहत होत्या. त्यामुळे विवाहिता सुनिता पाटील ह्या दूध फेडरेशन परिसरातील सत्यमपार्क येथे लहान मुलगा आयुष सोबत राहत होत्या. तर पती शरद पाटील हा त्याचे आईवडील आणि मोठा मुलगा वेदांत सोबत पिंपळकोठा येथे राहत आहे. दोन दिवसांपुर्वी शरद पाटील याने संतापाच्या भरात सत्यमपार्क येथे येवून घरातील सामानाला आग लावून दिली होती. यात विवाहितेचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
तर कानळदा रोडवरील त्रिभुवन कॉलनीत विवाहितेचे आईवडील राहतात. त्यांच्याकडे सुनिता पाटील यांचा लहान मुलगा आयुष देखील राहतो. त्यामुळे विवाहिता शुक्रवार १३ मे रोजी रात्री घरी एकट्याच होत्या. मध्यरात्री विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, शनिवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता विवाहितेची आई बेबीबाई भाईदास पाटील ह्या मुलीला डबा देण्यासाठी तिच्या घरी सत्यमपार्क येथे आल्या असता मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि गणेश सायकर, वासूदेव पाटील, सतिश हारनोळ, संजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा पती शरद पाटील यानेच तिला गळफास देवून खून केल्याचा आरोप मयत विवाहितेची आई बेबीबाई पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.