मुंबईतून ‘पॉझिटिव्ह’ न्यूज; तिसऱ्या लाटेत रुग्ण अधिक, मात्र…

0
11

मुंबई: मुंबईत करोनाच्या (Mumbai Corona) तिसऱ्या लाटेत (Mumbai corona third wave) मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, गंभीर करोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही कमी आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या २२ दिवसांत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीवरून असे दिसते की, दररोज सरासरी दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी करोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील दोन रुग्णांचा समावेश आहे.

अधिकृत सूत्रांनुसार, मुंबईत साधारण २१ डिसेंबरपासून करोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली होती. त्यानंतर ११ जानेवारीपर्यंत म्हणजेच गेल्या २२ दिवसांत ९३, ३९६ करोना रुग्ण आढळून आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळले असूनही गंभीर रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. २० डिसेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या १४१ इतकी होती. ती १० जानेवारीपर्यंत वाढून ४८१ पर्यंत पोहोचली आहे. ही आकडेवारी बघता, दररोज सरासरी १६ गंभीर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे दररोज १६ गंभीर रुग्ण आढळून येत असूनही, करोनामुळे होणारे मृत्यू काही प्रमाणात नियंत्रणात आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या घटली

करोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांच्या तुलनेत मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाण अधिक आहे. नवीन रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. केवळ ४८ तासांत मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ५ टक्क्यांनी घटली आहे. ८ जानेवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या १,०६,०३७ इतकी होती. ती ११ जानेवारी रोजी घटून १,००,५२३ इतकी आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत एकही ओमिक्रॉनबाधित रुग्ण नाही

मुंबईत सोमवारप्रमाणेच मंगळवारीही ओमिक्रॉनबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. मंगळवारी राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले ३४ रुग्ण आढळले. त्यात पुण्यातील २५, पुणे ग्रामीणमधील ६, सोलापूर २ आणि पनवेलमधील एक रुग्ण आहे. मुंबईत एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here