जळगाव : प्रतिनिधी I सण, उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दोन ते तीन गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक किंवा हद्दपारीची कारवाई पोलिसांकडून केली जाते. पण, माहिती अधिकारक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यावर शहरासह राज्यात 10 गुन्हे दाखल असतांना सुध्दा त्यांना पोलिस सरंक्षण दिले जाते आहे. हे पोलिस सरंक्षण काढून दिपककुमार गुप्ता यांना सुध्दा दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदमध्ये केली.
दीपककुमार गुप्ता यांना मिळालेले पोलिस सरंक्षण काढून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात यावे, या मागणीसाठी आरपीआयतर्फे शुक्रवार दि.7 रोजी दुपारी 12 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचीही माहिती अडकमोल यांनी दिली. मागणी पूर्ण न झाल्यास येत्या 26 जानेवारी रोजी आरपीआय संघटना पालकमंत्री यांना ध्वजारोहण करू देणार नाही. असाही इशारा पत्रकार परिषदमध्ये देण्यात आला. गुप्ता यांच्या तक्रारीमुळे 108 स्वस्त धान्य दुकानधारकांना नोव्हेंबर महिन्याचे धान्य मिळालेले नाही, अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी वाहिद खान, मिलिंद सोनवणे उपस्थित होते.