जळगाव ः प्रतिनिधी I गिरणा नदीच्या प्रश्नांसह नदीवर तयार होणारा प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेष पाटील यांनी सुरू केलेल्या गिरणा नदी परिक्रमेचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू झाला. सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्राजवळ असलेल्या जलारामबाबा मंदिरापासून परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली.
परिक्रमेतून बलून बंधाऱ्याची लोकजागृती होत असून, 380 किलोमीटर गिरणा परिक्रमेचा दुसऱ्या टप्प्यात खासदार पाटील यांनी 32 किलोमीटर पायी चालत केला. अभियानाचा दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभप्रसंगी खासदार पाटील यांच्यासह भाजपचे उपजिल्हाप्रमुख पी.सी. पाटील, महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, तालुकाप्रमुख गोपाळ भंगाळे, पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, मनोज काळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, विवेक ठाकरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जलारामबाबा मंदिर येथून या परिक्रमेला सुरुवात होऊन गिरणा पात्रातून पाणी आणून सावखेडा गावात परिक्रमेचे स्वागत झाले.