कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्या

0
3

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा रेट दहा टक्क्यांवर आणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पथकाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काल अधिकार्‍यांना दिल्या.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय तपासणी पथकाने बुधवारी सकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट दिली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जीएमसीचे प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित होते. केंद्रीय तपासणी पथकात दिल्ली येथील डॉ. पी.रवींद्रन, डॉ. सुनील खापर्डे, डॉ. संकेत कुलकर्णी, डॉ. प्रदीप आवटे यांचा समावेश आहे.
त्यांनी अधिष्ठाता दालनात अधिकार्‍यांशी संवाद साधला. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी त्यांना रुग्णालयातील कोरोना रुग्णांविषयी माहिती दिली. त्यांना पुरवल्या जाणार्‍या सोयी-सुविधा पाहून पथकाच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. अत्यंत सुटसुटीत, स्वच्छ असे कोरोना रुग्णांचे केलेले व्यवस्थापन पाहून पथकाने कौतुक केले. कोरोना नियंत्रणाबाबत टिप्स देऊन रुग्णसंख्या कशी नियंत्रित राहील याची माहिती पथकाच्या सदस्यांनी दिली.
रुग्णांचा ओढा खासगीकडे
गेल्या पाच-सहा महिन्यात अल्प उत्पन्न तसेच मध्यमवर्गीय रुग्णांची मोठी संख्या होती.या सर्व रुग्णांनी मनपा अथवा सरकारी रुग्णालयांत उपचार घेतले. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. संसर्ग उच्च उत्पन्न गटाकडे सरकल्याने आता खाजगी हॉस्पिटलकडे ओढा वाढल्याचे लक्षात येते. शहरात प्रमुख खासगी रुग्णालयांत बेड फुल्ल झाले आहेत. काही ठिकाणी आयसीयूतही बेड नाही. ऑक्सिजनची सुविधाही मर्यादितच आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने आता खासगी रुग्णालयांत रुग्ण वेटिंगवर आहेत.
ओटू टँक सुरू होणार
जीएमसीत उभारण्यात आलेल्या ओटू टॅकला परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी त्यात लिक्विड भरण्यात आले. दरम्यान, याची ट्रायल घेतली जाणार असून त्यानंतर टॅक कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सुविधा मिळणार आहे.
लक्षणे नसलेल्यांना जागेवरच उपचार द्या
जीएमसीत सर्व बेड फुल्ल असल्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यातील सर्व केंद्रांवर कोविड केअर सेंटर सुरू करावे व लक्षणे नसलेल्या रुग्णांना जागेवरच उपचार द्यावे. जेणेकरून जीएमसीत गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा होईल अशा सूचना पथकाने दिल्या. रुग्णांना मिळणार्‍या सोयी-सुविधाबाबत केंद्रीय तपासणी समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कौतुक केले.
उपाययोजनांबाबत माहिती
जीएमसीची पाहणी केल्यानंतर समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील कोवीड रुग्णांची स्थिती, प्रशासकीय तयारीबाबत माहिती दिली. नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे समितीने सांगितले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण उपस्थित होते.
खासगी हॉस्पिटलमध्येही ‘ओटू बेड’साठी वेटिंग
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओटू बेड फुल्ल झाले आहेत. परिणामी कोरोना रुग्णांनी आता खासगी रुग्णालयांची वाट धरली. परंतु शहरातील खासगी रुग्णालयाची परिस्थिती देखील गेल्या ३ ते ४ दिवसांपासून बिकट झाली आहे. तेथेही ओटू बेडसाठी वेटिंग आहे. महिनाभरापूर्वी खासगी रुग्णालयांचा पर्याय नसल्याने व जीएमसीत सर्व सुविधा उपलब्ध असल्याने अधिक रुग्ण याठिकाणीच दाखल झाले. कोरोनाच्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने बेडची समस्या निर्माण झाली आहे.
सध्या शहरात जीएमसीमध्ये सी-वन येथे २०, सी-टूला ७२, सी-थ्रीला २५ तर आयसीयूमध्ये २६ बेड आहेत. मात्र हे सर्व बेड फुल्ल आहेत. इकरा सेंटरला ५० ओटू बेडची व्यवस्था आहे. मात्र येथेही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून शहरातील सर्व खासगी रुग्णालये देखील पूर्ण भरले असल्याने काल अनेक रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here