बोदवड : प्रतिनिधी
बोदवड येथून कॉलेज संपल्यानंतर रिक्षातून घरी जात असतांना अचानक रिक्षा पडल्याने विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले. तृप्ती भगवान चौधरी असं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारी 17 वर्षीय तृप्ती तोल गेल्याने रिक्षातून खाली पडली होती. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेलवड येथील ही घटना घडली. तृप्ती चौधरीला अपघातात गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तृप्तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एसटीचा संप सुरू नसताना बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातील तब्बल 4 हजार 215 विद्यार्थी पासेस काढून शिक्षणासाठी अप-डाऊन करायचे. त्यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी असलेल्या अहिल्याबाई होळकर योजनेतून 1 हजार 365, दहावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 850 विद्यार्थिनी मानव विकास या बसमधून प्रवास करायच्या. याशिवाय 2 हजार विद्यार्थी मिळून एकूण 4 हजार 295 विद्यार्थी एसटी बसने नियमित प्रवास करत होते.
तर वाचली असती तृप्ती चौधरी
विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.